कोल्हापूर (प्रतिनिधी) : हॉटेलमध्ये तांबडा-पांढरा रश्याचे बिल दिले नसल्याच्या रागातून एका तरुणाला काठीने मारहाण करण्यात आली. यात विराज दिलीप जाधव (वय २३, रा. सांगरुळ) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी त्यांने पंकज खडके (रा. सांगरूळ) याच्यासह दोघांविरोधात करवीर पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगरुळ येथील पंकज खडके याचा हॉटेल व्यवसाय आहे. त्याच्या हॉटेलमध्ये सांगरुळ येथील संतोष कांबळे आणि विराज जाधव हे दोघे जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी ज्यादा तांबडा पांढरा रस्सा घेतला होता. मात्र त्याचे पैसे त्यांनी दिले नव्हते. हे पैसे मागण्यासाठी पंकज खडके यांच्याकडे गेले असता, त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यावेळी विराज जाधव हा वाद मिटवण्यासाठी आला असता, पंकज खडके आणि त्याच्या मित्राने विराज जाधव याला बेदम मारहाण केली. यावेळी काठीने केलेल्या हल्ल्यामध्ये विराज जाधव हा जखमी झाला. याप्रकरणी त्यांनी पंकज खडके व त्याचा वाकरे येथील मित्र पंकज या दोघांविरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.