कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून भाजपा मंगळवार पेठ मंडळाच्यावतीने मंगळवार पेठ पोस्टामधील कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्याहस्ते गुलाब पुष्प आणि मिठाई देऊन करण्यात आला.
सध्याच्या आधुनिक युगात पोस्टकार्ड लिहण्याची पद्धत कमी होताना दिसत आहे. फोन, मोबाईल, टी.व्ही., इंटरनेट अशा कोणत्याही सुविधा नसताना कित्येक वर्षे लोकांना एकमेकांशी संवाद साधताना टपालाशिवाय अन्य साधन नव्हते. पत्र येण्याची उत्सुकता, आपल्या प्रियजनांची खुशाली कळणार याची हुरहुर, पोस्टमन मामांची वाट बघणे, यामधील आतुरता आता अनुभवता येत नाही. यामुळे निदान टपाल दिनादिवशी तरी आपल्या प्रियजनांशी टपालाद्वारे संवाद साधा, असे आवाहन करून राहुल चिकोडे यांनी स्वत:च्या हाताने टपालावर पत्र लिहून सर्वांना विनंती केली.
तसेच मंगळवार पेठ येथील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तेथील सब पोस्ट मास्तर एस. एन. भोसले, पोस्टल असिस्टंट युवराज माळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल चिकोडे यांनी वाचन, लेखन याद्वारे आपल्या मनातील विचार अधिक प्रभावीपणे मांडता येतात, विचारांना दिशा येते म्हणून आठवड्यातून किमान एक पत्र आपल्या संबंधित व्यक्तिंना लिहावे आणि हा एक मनाला आनंद देणारा छंद जोपासावा असे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या देवरुख येथील एका मित्राला पत्र लिहून ते पत्र टपाल पेटीमध्ये टाकले.
यावेळी भाजपा सरचिटणीस गणेश देसाई, मंडल अध्यक्ष संतोष माळी, सुभाष माळी, गणेश चिले, अरविंद वडगांवकर, नरेश पाटील, संग्राम पाटील, सचिन आवळे, नरेंद्र पाटील, मारुती माळी, योगेश सावेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.