कागल (प्रतिनिधी) : राज्याच्या साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई या संस्थेच्या संचालकपदी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. राज्य सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची २०२२ – २३ ते २०२६ – २७ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये महिला राखीव मतदार संघातून श्रीमती घाटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे या स्व. शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी देखील कांही काळ राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्षपद भूषविले होते. अत्यंत मानाच्या अशा या शिखर संस्थेवर श्रीमती घाटगे यांची निवड झाल्याने शाहू ग्रुपच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या निवडीची बातमी समजताच शाहू उद्योग समूहात आनंदाचे वातावरण पसरले असून फटाक्यांची आतिषबाजी करत या निवडीचे सभासद आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.