कोल्हापूर (प्रतिनिधी) : धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेशाचा शासन आदेश काढण्यासाठी भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर पंढरपूरमध्ये ढोल बजाओ आंदोलन केले. या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा आहे का, हे भाजपच्या नेत्यांनी जाहीर करावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत केले. पडळकर पुढील आंदोलन मातोश्री, सिल्वर ओक बाहेर करतील का ? केले तर त्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी होणार का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विक्रम ढोणे म्हणाले की, पडळकर सातत्याने धनगर आरक्षणासंबंधी समाजाची दिशाभूल करीत आहे. भाजपच्या व्होट बँकेच्या राजकारणामुळे आंदोलनाची धार कमी करत आहे. पडळकर स्वत:च्या स्वार्थासाठी समाजाची दिशाभूल करताहेत. समाजाशी गद्दारी करून भाजपमधून विधान परिषदेची आमदारकी मिळवली. आता ते धनगर समाजाला भडकावण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.