( आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ) इस्रायली संरक्षण दल आयडीएफने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, हमासचा खात्मा करण्यासाठी गाझाच्या कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याला हमासच्या ठिकाणांची माहिती मिळाल्यास ते दक्षिण गाझासह शहरातील कोणत्याही ठिकाणी जातील आणि त्यांचा नायनाट करतील.

गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाला सहा आठवडे उलटून गेले आहेत. गाझा शहराचा उत्तरी भाग आता आपल्या ताब्यात असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायली सैन्यानेही उत्तर गाझावर आपली पकड मजबूत केली आहे कारण हमास सोबतची त्यांची लढाई तूर्त तरी संपेल असे वाटत नाही.

उत्तर गाझा ताब्यात घेतल्यानंतर इस्रायलने आता दक्षिणेत हल्ले तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. इस्रायलने पुन्हा एकदा हमासला पूर्णपणे संपवण्याची चर्चा केली आहे. मात्र, इस्रायलकडून युद्धोत्तर कोणतीही स्पष्ट योजना अद्याप सादर करण्यात आलेली नाही.

गाझामध्ये हमासने ओलिस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी करार करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. इस्रायली लष्कराने सांगितले की, गेल्या दोन दिवसांत दोन ओलिसांचे मृतदेह या एन्क्लेव्हमध्ये सापडले आहेत. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी देखील सांगितले आहे की, इस्रायली संरक्षण दलांनी प्रभावीपणे पट्टीचे दोन भाग केले आहेत. यानंतर हमासचे लपलेले ठिकाण उद्ध्वस्त करून ओलिसांना मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.