कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील मुदत संपलेल्या २३ महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. नव्या आदेशाप्रमाणे त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधित सर्व महानगरपालिकांना त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेतही  शहरातील  प्रभाग रचनेबाबत तयारी सुरू केली आहे.

उपायुक्त रविकांत अडसूळ  यांनी काही अधिकारी आणि कर्मचारी यांची नियोजनाची बैठक घेतली आहे. नव्या प्रभाग रचनेत प्रत्येक प्रभाग तीन सदस्यांचा असावा. २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरून मतदारांच्या प्रमाणात प्रभाग रचना करावी. अपवादात्मक परिस्थितीत दोन किंवा चार सदस्यांचे प्रभाग करावे. असे प्रभाग हे शेवटचे असावेत. प्रभागाची रचना उत्तरेकडून ईशान्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडे या दिशेने करावी. तसेच आयुक्त यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला  अधिकारी, नगररचनाकार, संगणक तज्ञ, प्रभाग रचनेशी संबंधित अधिकारी आणि आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांची समिती गठीत करावी, असे निर्देश दिले आहे. याशिवाय गुगल अर्थच्या नकाशावर प्रभाग रचनेची मांडणी कशी करावी, याचे हे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार प्रभाग रचनेची कार्यवाही करण्याचे नियोजन कोल्हापूर महानगरपालिकेत केले जात आहे.