कोल्हापूर (प्रतिनिधी) : वडगाव बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ नरंदे येथील नागोबा देवालय येथून आज (बुधवार) झाला. यावेळी माजी आ. अमल महाडिक, जि.प. सदस्य डॉ. राहुल आवाडे, युवा नेते विश्वेश कोरे यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. जिल्ह्यातील ताकदवान नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणावर निश्चितपणे प्रभाव टाकणारी ठरणार आहे.

महादेवराव महाडिक, आ. विनयरावजी कोरे, प्रकाश आवाडे, ना. राजेंद्र पाटील यड्रावकर, राजू शेट्टी, सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर अशा सहकारातील अनुभवी नेत्यांनी एकत्रित येत या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या माध्यमातून मोट बांधली आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून आजपर्यंत वडगांव बाजार समितीचे कामकाज केल्यामुळेच आज समितीची उलाढाल शंभर कोटींच्या वर गेली आहे. हा आलेख असाच चढता ठेवण्यासाठी सर्व मतदार बंधू-भगिनींनी कपबशी चिन्हावर शिक्का मारून राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी माजी आ. अमल महाडिक यांनी केले.

तर प्रचार शुभरंभाला झालेली गर्दी पाहता आजच राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे मत राहुल आवाडे यांनी व्यक्त केले.

यावेळी जि.प.सदस्य अरुण इंगवले, अशोक माने, जवाहर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब चौगुले, प्रसाद खोबरे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, विलास खानविलकर, जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय काश्मिरे, संदीप कारंडे, अरुण पाटील, शरद कारखान्याचे संचालक डी.बी.पिष्ठे आदी उपस्थित होते.