सांगली ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभेसाठी विशाल पाटलांची नेमकी भुमिका काय असणार ? याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण विशाल पाटील यांनी आपला लोकसभा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केला होता. यानंतर त्यांनी आपली भुमिका आजपर्यंत कायम ठेवली आहे. यातच महाविकास आघाडी काय भुमिका घेणार ? याची ही उत्सुकता राजकीय वर्तूळात आहे. पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी अखेर बंडाचं निशाण उचलणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विशाल पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी चर्चा सुरु असतानाच काँग्रेस भवनजवळ विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे वसंतदादा भवन असे नामकरण करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. वसंतदादा भवन असे नामकरण करत वसंतदादांचा एक फोटो देखील कार्यालयाबाहेर लावला गेला आहे. त्यामुळे विशाल पाटलांची वेगळी चुल मांडली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

काँग्रेस कारवाई करणार ?

विशाल पाटील हे गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे काँग्रेस त्यांच्यासाठी काय तडजोड करणार का ? वरिष्ठ पातळीवर काही हालचाली होणार का ? असा सवाल केला जात असताना आज पाटील यांनी घेतलेली भुमिका काँग्रेससह मविआच्या नियमावलीला पायदळी घेणारी असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार कारवाई होणार का ? असा सवाल आता चर्चिला जात आहे.