रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांत अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी झाला होता. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडून मिळाला. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या, तर त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्या निधनाने एका चतुरस्त्र अभिनेत्यास चित्र-नाट्यसृष्टी मुकली आहे.

विक्रम गोखले यांना बाळ कोल्हटकर यांनी त्यांच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. विक्रम गोखले यांनी पाच वर्ष बाळ कोल्हटर यांच्यासोबत काम केलं. विजया मेहता यांच्या बॅरिस्टर या नाटकामध्ये काम केलं. विक्रम गोखले यांचे पहिले गाजलेले व्यावसायिक नाटक हे ‘स्वामी’ होते. या नाटकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अभिनयासोबत त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन देखील केले. नकळत सारे घडले, महासागर, समोरच्या घरात या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

अकेला, अग्निपथ, ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले. या सुखांनो या, अग्निहोत्र, संजीवनी, सिंहासन या मालिकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव, वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीने बघतात.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या कथानकाचे आणि चित्रपटातील कालाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले.

विक्रम गोखलेंच्या आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची खासियत आहे. ‘एबी आणि सीडी’, ‘नटसम्राट’, ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘कळत नकळत’, ‘दुसरी गोष्ट’, ‘अनुमती’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘आघात’ अशा अनेक मराठी सिनेमांत विक्रम गोखलेंच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. ‘स्वर्ग नरक’, ‘इंसाफ’, ‘खुदा गवाह’अशा हिंदी सिनेमांतदेखील त्यांनी काम केले आहे. रंगभूमी, छोट्या-मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणारे विक्रम गोखले वेब-सीरिजपासूनदेखील मागे राहिलेले नाहीत. त्यांनी ‘उडान’, ‘क्षितिज ये संजीवनी’, ‘जीवन साथी’, ‘सिंहासन’, ‘मेरा नाम करेगी रोशन’ या वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे. सध्या विक्रम गोखलेंचा ‘गोदावरी’ सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे.

विक्रम गोखले यांनी वयाच्या २६ व्या वर्षी १९७१ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच सिनेमात त्यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. या सिनेमाचे नाव ‘परवाना’ असे होते. ‘हम दिल दे चुके सनम’ या ब्लॉकबस्टर सिनेमात विक्रम गोखलेंनी काम केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या माध्यमातून कमबॅक केले होते.

नाकारले पुरस्कार

विक्रम गोखले यांचा कोणत्याही पुरस्कारांवर विश्वास नव्हता. त्यांनी शासकीय पुरस्कारांनाही नकार दिला. एका मुलाखतीत त्यांनी आपले मत मांडताना सांगितले होते की, ‘पुरस्कार सोहळे हे फक्त फॅशन झाली असून, पैसे खिशात घेऊन पुरस्कार घेणारे मी पाहिले आहेत. अशा मांदियाळीत मला बसण्यात स्वारस्य नाही. कोणत्याही पुरस्काराने एखादा नट चांगला आहे की नाही हे सिद्ध होत नाही. त्याचं कामच बोलतं.’