नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकारणातील एक मोठे नेते म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी आज (गुरुवार) निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीचं त्यांची शस्त्रक्रिया देखील झाली होती. रामविलास पासवान यांचा मुलगा आणि एलजेपी नेते चिराग पासवान यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
रामविलास पासवान हे देशातील एक अनुभवी नेते म्हणून ओळखले जात होते. पाच दशकाहून अधिक त्यांच्याकडे राजकारणाचा अनुभव होता. ते नऊ वेळा लोकसभा आणि दोनवेळा राज्यसभा खासदार राहिले होते. बिहारमध्ये त्यांनी आपल्या पक्षाला मोठं केले. पासवान यांनी अनेक वेळा केंद्रिय मंत्रिमंडळातसुद्धा खाते सांभाळले होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, एच.डी.देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये पासवान मंत्रिपदी कार्यरत होते.