रायगड ( वृत्तसंस्था ) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रायगड जिल्ह्यात सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर आसूड ओढले. सध्याच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत अजित पवार यांना क्लीन चिट, हीच का मोदी गॅरेंटी असा सवाल केला. देशातील विरोधी पक्षातील नेते आणि सरकारवर ईडीच्या धाडीवर धाडी सुरु असल्याने उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राम मंदिर उभारले गेलं याचा आनंद आहे. मात्र ती मोदींची प्रॉपर्टी नाही. या सोहळ्यामध्ये एक निर्बुद्ध मोदीला देव मानत असेल आणि मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत असेल तर तो बिनडोक आहे. ते कोणी असू द्यात, ते बिनडोक आहेत, अशा शब्दात त्यांनी गोविंदगिरी महाराजांनी केलेल्या तुलनेवरून समाचार घेतला. हे सरकार मणिपूरमध्ये जात नाही, बोलायला तयार नाहीत त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी अशी टीका त्यांनी मोदींवर केली.

शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा पुन्हा उल्लेख

शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक वजनदार नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या याच गुन्ह्याच्या आधारे ईडीचा तपास सुरू आहे. रोहित पवारांची देखील याच प्रकरणात सध्या ईडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता ईडीच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत असं ही त्यांनी म्हटलं आहे.