सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत यादी प्राप्त झालेल्या 615 उमेदवारांमधून एक उमेदवार अपात्र 28 उमेदवार गैरहजर राहिल्याने 586 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने पडताळणी झालेल्या शिक्षण सेवक उमेदवारांचे शाळा नियुक्तीचे समुपदेशन प्रशासनाने पूर्ण करत काहींना नियुक्तीपत्र ही दिली.

यामुळे या जिल्ह्यात अनेक वर्षे दुर्गम भागात काम करणाऱ्या बदली पात्र शिक्षकांवर अन्याय होत असल्याची कैफियत मीनल मोहन राणे या वरिष्ठ शिक्षिकेने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे समोर मांडली. त्यामुळे नवीन शिक्षण सेवकांच्या समुपदेशन व नियुक्तीला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. तर जुन्या बदली पात्र शिक्षकांच्या प्रथम बदल्या आणि नंतर नवीन शिक्षण सेवकांना नियुक्त्या हा निर्णय झाला.

गेले तीन दिवस कागदपत्र पडताळणीसाठी दाखल झालेल्या शिक्षणसेवक उमेदवारांचे शाळा नियुक्तीसाठी समुपदेशन घेऊन नियुक्ती देण्याची प्रक्रिया आज (शुक्रवार) जिल्हा परिषद प्रशासनाने पारदर्शकपणे राबविली. गेले चार दिवस सुरळीत व शिस्तप्रिय वातावरणात ही प्रक्रिया सुरू होती. मात्र आज अपंग महिला या अर्ध्या शिक्षण सेवकांना शाळानुसार नियुक्तीपत्र देण्यात आल्यानंतर शासनाकडून प्रक्रिया थांबविण्याचे आदेश प्राप्त झाले.

त्यामुळे नियुक्तीपत्र मिळालेल्या शिक्षण सेवकांनी एकच हंगामा केला. त्यामुळे काय जिल्हा परिषदेमध्ये तणाव निर्माण झाला होता. आम्हाला नियुक्तीपत्रे द्या ही प्रक्रिया पूर्ण करा अशी त्यांची मागणी होती. मात्र ही जर प्रक्रिया पूर्ण झाली असती तर जुन्या दुर्गम भागातील अनेक वर्ष काम केलेल्या शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळणे अवघड झाले असते.

याची दखल पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते किरण सामंत यांनी घेतली. शिक्षक कर्मचारी नेत्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तरी ज्येष्ठ शिक्षिका मीनल राणे यानी थेट पालकमंत्र्यांना गाठले. त्यांच्यासमोर ही कैफियत मांडताच मंत्रालय पातळीवरून सर्व सूत्रे हलली. नवीन शिक्षण सेवक नियुक्ती समुपदेशन प्रक्रियेला शासनाच्या सचिव पातळीवरून स्थगिती मिळाली.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रमाणेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रथम जुन्या बदली पात्र शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली पूर्ण करावी व त्यानंतर नवीन शिक्षण सेवकांचे समुपदेशन घेऊन त्या त्या शाळांवर नियुक्ती द्यावी अशा सूचना आल्या. त्यामुळे आता निवड झालेल्या शिक्षण सेवकांना रिक्त होणाऱ्या शाळांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील व शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भरती प्रक्रिया आणि जुन्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत शासनाकडून आलेल्या निर्णयांची माहिती दिली. जुन्या शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या पूर्ण करून नंतरच रिक्त शाळांची यादी अंतिम होणार आहे. जुन्या शिक्षकांच्या बदल्या करून ज्या शाळा रिक्त होतील, त्या रिक्त शाळांच्या ठिकाणी नवीन शिक्षण सेवक समुपदेशन पद्धतीने नियुक्त होणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास बाराशे शिक्षक पदे रिक्त असून ज्या शाळांमध्ये शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांची जास्त पटसंख्या असून कमी शिक्षक आहेत, अशा शाळांवर नवीन शिक्षक सेवक नियुक्ती देण्याबाबत पुढच्या काळातही प्रशासनाचा आग्रह राहणार आहे.