पन्हाळा (प्रतिनिधी ) मागील लोकसभा निवडणूकीत मतरारांनी धैर्यशील मानेंना दिलेले मतदान हे हिंदुत्व आणि मोंदींकडे पाहून दिलेले मतदान होते. त्यामुळे मोदींच्या सोबत जाणे हि कसली गद्दारी,पदाच्या हव्यासापोटी विरोधी विचारांच्या सोबत जाणार्‍यांनी मतदारांशी खरी गद्दारी केल्याचा घणाघात खासदार धैर्यशील माने यांनी केला. ते कोतोली फाटा इथं पन्हाळा भाजपच्या वतीनं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक,माजी आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते.

यावळी शौमिका महाडिक यांनी, ही गावपातळीवरील निवडणूक नसून ही निवडणूक देशाचे भविष्य ठरविणारी आहे. देश भक्कम बनविण्यासाठी आणि मोदींना सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या खासदारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले की, सोलरच्या माध्यमातून घरोघरी मोफत वीज देण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे. मोदींजींचे विकसनशील भारत बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदींना पंतप्रधान करण्याची गरज आहे यासाठी महायुतीच्या धनुष्यबान चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केलं.

यावेळी धैर्यशील माने म्हणाले की, निस्वार्थी असलेल्या मोदीजींची एकशे तीस कोटी जनता भांडवल असून केंद्रात मोदीच पंतप्रधान होणार हे नक्की आहे. त्यामुळे धैर्यशील मानेंना मतदान म्हणजे मोदींना मतदान असल्याचे खासदार माने यांनी सांगितले. तसेच पन्हाळा, शाहुवाडी तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी आणि दत्त आसुर्ले साखर कारखाना खांडसरीचा कारखान्यात रूपांतर करण्याचे काम माजी खासदार बाळासाहेब माने यांनी केले. मतदार संघात आठ हजार दोनशे कोटीची कामे करुन देखील कामाचे ढोलके वाजविण्यास मी कमी पडलो. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला जनता बळी पडणार नसल्याचे सांगितले.

तसेच पन्हाळा आणि शाहुवाडी तालुक्यातील युवकांच्या हाताला रोजगार निर्माण करण्यासाठी एमआयडीसीला मंजुरी आणल्याचे सांगितले. गाव तिथे विकासकामे केली असून मतदार संघातील एक गाव विकासकामापासून वंचित असल्याचे दाखविल्यास मतदान मागणार नसल्याचे सांगितले. शाहुवाडीतील विकासकामांच्या गप्पा मारणार्‍या उमेदवाराच्या गावातील पाणी योजनेला आम्ही मंजुरी मिळवून दिल्याचा टोला देखील माने यांनी हाणला.

यावेळी गोकुळचे संचालक विश्वास जाधव, कल्पना चौगुले, अरुण इंगवले, डॉ. अजय चौगुले, अमरसिंह भोसले, सुरेश बेनाडे, उदय सरनोबत, दादासाहेब तावडे, प्रकाश देशमुख तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.