भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती दर्शविणारी अनेक आश्चर्यकारक स्मारके आहेत. ही स्मारके देशभरात आढळतात आणि ती कलात्मक कौशल्याचा खजिना आहेत. प्रसिद्ध ठिकाणांव्यतिरिक्त, जुने राजवाडे, मंदिरे आणि वन्यजीव अभयारण्य यांसारखी इतर अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. यांची भारतातील नागरिकांनाच नाही तर बाहेरील देशातील पर्यटकांना सुद्धा भुरळ पडली आहे.

१)ताजमहाल, आग्रा

जगातील सात अद्भुत आश्चर्यांमध्ये समावेश असलेला ताजमहाल उत्तर प्रदेशातल्या आग्रा शहरात यमुना नदीच्या तीरावर स्थित सर्वात सुंदर आणि देशातल्या प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे आणि निश्चितच भारताची शान आहे. हे पांढरे संगमरवरी स्मारक शहाजहान या मुघल सम्राटाने आपल्या प्रिय पत्नीच्या मुमताजच्या स्मरणार्थ बांधले होते. ज्यामुळे त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणूनही संबोधलं जातं. अप्रतिम वास्तुकला आणि त्यामागील इतिहासामुळे, ताजमहाल हे जागतिक वारसा स्थळ जगभरातील सर्व पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाले आहे.

२) म्हैसूर पॅलेस, कर्नाटक

म्हैसूर पॅलेस हा कर्नाटकातील म्हैसूर शहरातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक राजवाडा आहे. आकाराने प्रचंड असलेला हा राजवाडा आजही अत्यंत चांगल्या स्थितीत जतनकेला गेला आहे राजवाड्यात आत जाण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. कोरीव कामाने नटलेले खांब, छत, दरवाजे आणि जगभरातून गोळा केलेल्या कलात्मक वस्तूंचे संग्रह अक्षरश: डोळे दिपवतात. सुरुवातीला हा राजवाडा पूर्ण लाकडातच बांधला होता. मात्र, आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हा नवा राजवाडा सन १९११-१२ मध्ये पुन्हा बांधण्यात आला.

३ ) गेटवे ऑफ इंडिया, मुंबई

मुंबई जरी बॉलीवूड कलाकार आणि चित्रपटांसाठी अत्यंत प्रसिद्ध असली तरी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. जवळच ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल यांसारखी पंचतारांकित हॉटेल्स असल्यामुळे गेटवे ऑफ इंडिया पर्यटक, छायाचित्रकार यांच्यासाठी कायमच एक लोकप्रिय ठिकाणं राहिले आहे. दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र आणि एका बाजूला डोळे दिपवणारी मुंबई महानगरी यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

४ ) हवा महल, जयपूर

राजस्थान हे पर्यटकांचे एक आवडते राज्य आहे. येथील किल्ले, महाल, शहरे, वाळवंट यांची अनोखी शान आहे. राजस्थानची राजधानी जयपूरला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. ‘गुलाबी शहर’ अशी ओळख असलेल्या या शहरात असणारा त्याच्या अद्भूत वास्तुकला, इतिहास आणि सुंदर रचनेमुळे मुळे पर्यटकांना आकर्षित करतो. पाच मजली इमारत असलेल्या या हवामहालाला भक्कम पाया नाही. त्यामुळे पायाशिवाय बांधला गेलेला हा जगातील सर्वात उंच महाल मानला जातो

५ ) अजिंठा आणि वेरुळ लेणी, छत्रपती संभाजीनगर

ही लेणी भारतातील प्राचीन वास्तूंपैकी एक आहेत आणि औरंगाबादमधील (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) सर्वात जुनी दगडी लेणी आहेत. वेरुळ लेण्यांमध्ये दगडी कोरीवकाम, बौद्ध मठ आणि मंदिरे आहेत, तर अजिंठा लेणी बौद्ध वास्तुकला, चित्रे आणि शिल्पे प्रदर्शित करतात. कैलाश मंदिर नावाचे शिवमंदिर देखील आहे आणि ते गुहा क्रमांक १६ मध्ये पाहायला मिळते. या लेण्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खूप लोकप्रिय असून परदेशी पर्यटक इथं आवर्जुन हजेरी लावतात.

६ ) चारमिनार, हैदराबाद

हैदराबाद शहर स्वतःमध्येच एक सुंदर अशी कलाकृती आहे. या शहराची ओळख असलेला ‘चारमिनार’ हि तेथील विशेष लक्षवेधी वस्तू आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ‘चारमिनार’ हा इस्लामिक वास्तुकलेच उत्कृष्ट उदाहरण आहे. जेव्हा १५९१ महम्मद कुली कुतुबशाह द्वारे शहरातील प्लेगची साथ संपल्याच्या आनंदात एक वास्तू बनवण्यात आली. तीच हि ‘चारमिनार’. चार मिनारांनी मिळून बनलेली एक चौरसाकार प्रभावशाली आकर्षक इमारत म्हणजे ‘चारमिनार’. हि वस्तू पुढे हैद्रराबाद शहराची ओळख बनली.


.