कळे (प्रतिनिधी) : येथील कुंभारवाड्यात गणेशमूर्तींवर रंगाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गणेशमूर्ती रंगविण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण कामात व्यस्त आहेत. दरवर्षी या ठिकाणचे मूर्तिकार जवळपास हजारो गणेशमूर्ती आणि गौराई घडवितात. परिसरात गणेशमूर्तीचे स्टॉल व बाजारपेठा सजल्या आहेत. कळे परिसरातील ४० गावांतून मूर्तींना मोठी मागणी आहे.

यंदा सर्वच गोष्टी महागल्याने मूर्तीच्या किमतीतही २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे मूर्ती कारागिरांना फटका बसला होता. कोरोनानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे मूर्तिकारांबरोबरच नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मूर्ती घडवताना त्याची उंची, शाडूची माती, लाल माती, मुलतानी मातीच्या वापरावर भर देण्यात आला असला तरी  प्लास्टरचा वापरही जास्त प्रमाणात होऊ लागला आहे. वाढलेली मजुरी, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली १० टक्के  वाढ, रंगांची २५ टक्के  वाढ, इमिटेशन ज्वेलरी २० टक्के  यामुळे गणेशमूर्तीची किंमत यंदा २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

घरगुती गणेशमूर्ती ३ इंचापासून ३ फुटांपर्यंत, सार्वजनिक ३ फुटांपासून ११ फुटांपर्यंत मागणीनुसार तयार करण्यात आल्या आहेत. गणेशमूर्तीचे दर घरगुती ५००ते ४००० रुपयांपर्यत, तर सार्वजनिक ५०००ते ४० हजारांपर्यंत आहेत. कुंभार मूर्तिकारांकडून रेखीव, सुबक, आकर्षक तसेच योग्य रंगसंगतीचा वापर करून गणेशमूर्ती तयार केल्या आहे. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, पुण्यातील मानाचे पाचही गणपती, टिटवाळा, चौरंग पद्मासन, बालगणेश,शिवरेकर, जयमल्हार, सिध्दिविनायक,चरण पूजनाचे गणपती यासह ७२ प्रकारच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.