माढा : आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात काम करणार असल्याचे स्पष्ट करत रामराजे यांना माझी भूमिका पटली नाही तर आपण राजकारणापासून संन्यास घेऊ असं राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माढ्यातील महायुतीतील  अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपच्या विरोधात नाही पण भाजपने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात आहाेत. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रघुनाथराजेंनी स्पष्ट केले आहे. रघुनाथराजे निंबाळकर यांनी आज अकलूज येथे धैर्यशिल मोहिते पाटील यांची भेट घेतली.

धैर्यशील मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.त्यांचा आज वाढदिवस आहे.या निमित्त तालुक्यातील लोकांनी त्यांचा तुतारी देऊन सत्कार केला.यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यावेळी बोलताना रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, आम्ही गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. भाजपने कोणताही नेता अगदी पियुष गोयल, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांना माढ्यातून उमेदवारी दिली असती तर त्यांना निवडून दिले असते.पण आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या उमेदवाराचे काम आम्ही करणार नाही.