कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील वडणगे येथील एका बंगल्याच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी सुमारे ४ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी अनिल राजाराम सादुले (वय ५५, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उत्तरेश्वर पेठ येथे राहणारे अनिल सादुले यांचा वडणगे येथेही एक बंगला आहे. ते कुटुंबीयांसह उत्तरेश्वर पेठ येथील घरामध्ये राहण्यासाठी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या वडणगे येथील बंगल्याच्या खिडकीचे गज उचकटून बंगल्यामध्ये प्रवेश केला. त्यांनी आतील लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्याच्या तीन चेन, दोन अंगठ्या, सोन्याचे सहा कॉईन, कर्णफुले असे साडेसात तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीच्या तीन समया, तीन मूर्त्या, आरतीचे ताट, पाच ग्लास, चार तबक, चांदीचे चार कॉइन, चार छल्ले, चार नीरांजन असे दोन किलो चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यानी लंपास केला.

घरी आल्यानंतर सादुले यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. यानंतर त्यांनी चोरट्यांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.