सौदी अरेबिया (वृत्तसंस्था) : घऱात पाळळेल्या सिंहानेच मालकावर हल्ला करुन त्याला खाऊन टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इराकच्या कुफा येथे अकील फखर अल-दीन (वय 50) यांना त्यांच्या पाळीव सिंहाने ठार केलं. या घटनेने नजफ गव्हर्नरेटमधील अल-बरकिया जिल्हा हादरला आहे. अल-दीनवर आपल्या अल-हसिनत परिसरातील त्यांच्या घराच्या बागेत असलेल्या सिंहाच्या पिंजऱ्याजवळ जात असताना हा हल्ला करण्यात आला.

वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अकील फखर अल-दीन मागील एका महिन्यापासून त्यांच्या बागेत सिंहाला पाळत होते. ते पिंजऱ्याजवळ येताच सिंहाने उडी मारुन अचानक हल्ला केला. यानंतर सिंहाने आपल्या तीक्ष्ण दातांनी त्यांचा चावा घेतला. मानेला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा तात्काळ मृत्यू झाला. “एका शेजाऱ्याने कुटुंबाच्या ओरडण्याचा आणि मदतीसाठी याचना करत असतानाचा आवाज ऐकला. त्याने घटनास्थळी धाव घेत त्याच्या वैयक्तिक शस्त्राने सिंहाला गोळी मारून ठार केलं.

या नंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत होता. या घटनेने पुन्हा एकदा इराकमधील निवासी भागात कोणत्याही कायदेशीर चौकटीशिवाय किंवा पशुवैद्यकीय देखरेखीशिवाय भक्षक प्राण्यांचे पालनपोषण केलं जात असल्याच्या प्रकारांना उजेडात आणलं आहे, ज्यामुळे सार्वजनिक सुरक्षेला थेट धोका निर्माण झाला आहे.