अकोला (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश गजभिये (७१) यांचे कोरोनामुळे आज (रविवार) निधन झाले. पंधरा दिवसापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होते. मात्र, अचानक औषधोपचाराला साथ न दिल्यामुळे त्यांचे निधन झाल्याची बाब पुढे आली आहे.
डॉ. इंदुप्रकाश गजभिये हे शरीरक्रियाशास्त्र विषयाचे तज्ञ होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेल नागपूर, आंबेजोगाई,कोल्हापूर, धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी सेवा दिली. वयाच्या ५८ व्या वर्षी ते आयजेएमसी नागपुर येथून सेवानिवृत्त झाले होते. सामाजिक पार्श्वभूमी लाभलेले डॉ. इंदुप्रकाश हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले असले तरी विद्यार्थीप्रिय प्रोफेसर म्हणून त्यांची ओळख होती. सेवानिवृत्तीनंतरही अस्वस्थ न बसता नाशिकच्या एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात ते आपली सेवा देत होते.
पंधरा दिवसापूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने पुण्यावरून अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे कोरोना टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव आढळून आले. तसेच ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर औषधोपचाराने साथ न दिल्यामुळे त्यांचे अकोल्यात निधन झाले.