कोल्हापुर (प्रतिनिधी) : महाव्दार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिरातील मूर्तीवरील १९० वर्षांपासूनचा शेंदूरचा थर काढून देवस्थान समितीच्या वतीने मूर्ती मूळ रूपात आणण्यात आली आहे. या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना विविध धार्मिक सोहळ्यांनी झाली. तसेच यानिमित्ताने गणेश यागचे आयोजन करण्यात आले होते.

मंदिराच्या शिखरावरील कलशास क्रेन बकेटच्या साह्याने अभिषेक करण्यात आला. सनई- चोघड्याच्या तालात मंदिरासाठीचे भव्य आकर्षक तोरण वाजतगाजत आणण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, संयोगिता नाईकवाडे यांच्या हस्ते धार्मिक विधी झाले. यानंतर आरती करून गणेशमूर्ती भाविकांना खुली करण्यात आली. मूळ रुपातील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मूर्ती संवर्धन संपूर्ण प्रक्रियेचे कार्य ऋषीकेश साळुंखे व सहकाऱ्यांनी केले.

गणेशमूर्तीसाठी चांदीचे डोळे, डोक्यावरील किरीट, चांदीचा हात,चांदीचे मोदक ही आभूषणे मारुतीराव रवळनाथ देसाई, नीताताई खर्डे-पाटील चांदीचा एक हार, प्रथमेश योगेश पाटील, सुलोचना नाईकवाडे यांनी नेत्र अर्पण केले.