कोल्हापूर : कोल्हापुरातील रंकाळा परिसरातील एका रुग्णालयात मृतदेहावरील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.कोल्हापुरात रंकाळा तलाव परिसरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या शालन पाटील वय ८० यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकारानंतर मृत शालन पाटील यांचा मुलगा अजित पाटील यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

आजारी असल्यामुळे शालन पाटील या दोन दिवसापूर्वी रंकाळा तलाव परिसरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत्या.उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती गंभीर होती. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांच्या अंगावरील सर्व दागिने नातेवाईकांना काढून घेण्यास सांगितले होते. नातेवाईकांनी दागिने काढत असताना हातातील दोन तोळ्याचे गोठ निघत नसल्यामुळे ते तसेच ठेवले व इतर दागिने काढून घेतले.यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू नंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी हातातील दोन तोळे वजनाचे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचा गोठ नसल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. चौकशीअंती दागिने न मिळाल्याने मुलगा अजित पाटील यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली.