कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप ट्रस्टच्यावतीने आणि सिने अभिनेते अक्षयकुमार यांच्या विशेष मदतीतून येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या दोन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या कै. अरुणा हरीओम भाटिया इमारतीचे भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव अजित पाटील आणि अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा.आ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सचिव अजित पाटील म्हणाले की, सन २०२१ च्या महाप्रलयकारी महापुरात कोल्हापुरातील विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेत कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप ट्रस्टच्याद्वारे सामाजिक आपत्ती व्यवस्थापनाचा वस्तूपाठ निर्माण केला. कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप ट्रस्ट व प्रशासन यांच्या समन्वयातून २०२१ च्या महापुरात याचा प्रत्यय आला. यास्तव स्थानिकासोबत, देश, विदेशातूनही कोल्हापूर डिझास्टार मॅनेजमेंटला मोलाचे योगदान लाभले. अशा समाजाभिमुख प्रयासांची संवेदनशील दखल घेत हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अक्षयकुमार यांच्या विशेष मदतीतून त्यांच्या पूज्य मातोश्री अरुणा हरीओम भाटिया यांच्या नावे गरजू मुलांच्या शिक्षणासाठी गेली ४९ वर्षे कार्यरत असलेल्या येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या महापुरात पडलेल्या कन्या शाळेच्या नूतन इमारतीसाठी उपयोगात आणण्याचा कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपने संकल्प केला.
ही अद्यावत अशी दोन कोटी रुपये खर्च करून इमारत बांधण्यात येणार आहे ही संपूर्ण इमारत अभिनव प्राथमिक शाळा व बालक मंदिरसाठी वापरण्यात येणार असून या इमारतीला कै. अरुणा हरीओम भाटिया विद्यालय असे नाव देण्यात येणार असून या इमारतीचा भूमिपूजन व पायाभरणी समारंभ मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावतजी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती अजित पाटील व संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा.आ. पाटील यांनी दिली.
यावेळी मुख्याध्यापक किरण पाटील, पर्यवेक्षक शरद तावदारे, सहा. शिक्षक सचिन गुदले, अभय ताटे, दीपक चौगुले उपस्थित होते.