सांगली : सांगली लोकसभेसाठी बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांनी आज (22 एप्रिल) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघार न घेता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि आपला निवडणूक अर्ज कायम ठेवला. त्यामुळे सांगली लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार असं बोललं जात असताना विशाल पाटील यांनी मात्र लढत तिरंगी नसून दुरंगी होणार म्हणत चंद्रहार पाटलांना महत्व दिलं नाही.

सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी विशाल पाटील आपली उमेदवारी मागे घेतील, असं बोललं जात होतं. परंतु त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. उलट त्यांनी ही निवडणूक तिरंगी नसून दुरंगी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी एकप्रकारे चंद्रहार पाटलांना फारसं महत्त्व दिल्याचं दिसून येत नाही.

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विशाल पाटील म्हणाले की, आमच्याकडे इन्कमिंग होत असून आणखी लोक आमच्यासोबत येण्यास तयार आहेत. सांगली लोकसभेची निवडणूक तिरंगी होणार, असं काहीजण म्हणत आहेत. परंतु प्रत्यक्षात मी काँग्रेसचा बंडखोर विरुद्ध संजय काका पाटील यांच्यातच लढत होणार आहे.

विशाल पाटील पुढे म्हणाले की, तसे १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु ते स्पर्धेत नाहीत. सक्षम उमेदवार येऊ नये आणि भाजपला सोपं जावं म्हणून सगळ्यांनी डावपेच केले, चिन्ह वाटप करताना चांगलं चिन्ह मिळू नये म्हणून काहींनी प्रयत्न केले, शिवाय बॅलेटवर खाली नाव यावं, यासाठीही प्रयत्न झाले. अशा खालच्या पातळीवर राजकारण करणाऱ्यांना जनता ७ तारखेला धडा शिकवेल.