पेठवडगाव (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे वनविभागाने शेतात जाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे एका शेतकऱ्याने आपला बैल ग्रामपंचायतीसमोर बांधून त्याच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.

कासारवाडी येथे शेत शिवारात जाणारे रस्ते वनविभागाने बंद केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी तसेच वैरण आणण्यासाठी अडचण होत आहे. कासरवाडी येथे क्रशर उद्योग मोठ्या प्रमाणावर असून, वनविभागाने या उद्योगाकडे जाणारा रस्ता काही दिवसांपूर्वी बंद केला. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. शेतीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता मिळावा, या मागणीसाठी ग्रामपंचायतचा’ ना हरकत ‘दाखला आवश्यक आहे; परंतु सध्या याबाबत हरित लवादाकडे सुनावणी सुरू असल्याने ग्रामपंचायतीने दाखला देण्यास टाळाटाळ केल्याने येथील शेतकरी अर्जुन जोंधळे यांनी ग्रा.पं. कार्यालयासमोरच आपला बैल बांधला व त्याच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यास ग्रामपंचायतीला सांगितले.