मुंबई : हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि मंत्री अब्दुल सत्तार यांची भवेत घेतली आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी या तिघांमध्ये गुप्त बैठक झाली आहे. या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील राजकीय समीकरणं बदलणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे संतोष बांगर यांची भेट झाल्यानंतर हिंगोलीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री असून त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. अधिवेशनाच्या कालावधीत ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही ठाकरेंना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाही आता रंगू लागल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या दरम्यान संतोष बांगर आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण आता हे दोन्ही नेते अब्दुल सत्तारांच्या घरी भेटले आणि ही भेट गुप्त होती. त्यामुळेच ही भेट हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं बदलवणारी ठरण्याची शक्यता आहे.