कळे ( प्रतिनिधी ) पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फे असंडोली येथील ‘थळ पांढरी’ देवस्थान परिसरात असलेला 100 वर्षांपूर्वीचा बोधीवृक्ष ( पिंपळ ) लगतच्या शेतात उन्मळून पडला. मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सावर्डेवासियांचा 100 वर्षांपासूनचा जुना साथीदार बोधिवृक्ष उन्मळून पडल्याने सावर्डेसह परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
या घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. शंभर वर्षांपूर्वीची साक्ष देणारा हा बोधीवृक्ष असून आमचे बालपणही या बोधिवृक्षाखाली खेळण्याबागडण्यात गेले असल्याची माहिती जुन्या पिढीतील नागरिक धोंडीराम काळे ( वय 94 ) यांच्यासह जाणकारांनी दिली.
त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. उन्मळून पडलेल्या बोधीवृक्षाच्या शेजारीच काही नागरिकांची घरे आहेत. नेमका हा वृक्ष ज्या बाजूला शेतजमीन आहे त्याच बाजूला उन्मळून पडला. त्यामुळं मोठा अनर्थ टळला अन नागरिकांनी या बोधीवृक्षाचे आभार मानले.
