गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील तेरणी येथील अनिल केंपाण्णा भोई (वय ३०) या तरुणाला बारा वर्षीय मुलीवर जबरी अत्याचार केल्याच्या आरोपाखाली २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील अतिरिक्त सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी निकाल दिला.

आरोपी अनिल भोई हा मूळचा कर्नाटकचा आहे. अनेक वर्षांपासून तो नातेवाइकांकडेच राहतो. एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन एका अल्पवयीन मुलीवर त्याने २८ सप्टेंबर २०२० रोजी अत्याचार केला. या कृत्याबद्दल कोणाला सांगितलेस तर तुला व तुझ्या आई-वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती.

याप्रकरणी अनिल भोई विरुद्ध पीडित मुलीच्या नातवाइकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. उपविभागीय पोलिस अधीक्षक गणेश इंगळे व सहायक पोलिस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांनी या घटनेचा तपास करून भोईला अटक केली. या घटनेतील सबळ पुरावे गोळा करून इंगळे व सूर्यवंशी यांनी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात भोईविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

सरकारी वकील अ‍ॅड. एस. ए. तेली यांचा युक्तिवाद, घटनेबद्दलचे सबळ पुरावे, पीडित मुलगी व तिच्या आईसह दहा जणांची साक्ष आणि वैद्यकीय अहवालावरून भोई याला या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोक्सो कायद्यांतर्गत त्याला २० वर्षे सश्रम कारावास, २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास आणि धमकीप्रकरणी सहा महिने सश्रम करावास, एक हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.