कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘सभासदांना बांधकाम व्यवसायाच्या कठिण कालावधीमध्ये टिकून राहणे महत्वाचे आहे, असे सांगून लहान शहरातील सभासदांना चांगले व्यवसायिक मार्गदर्शन केले. ग्राहकांना व कामगार वर्गाला सांभाळून संयमाने प्रकल्प उभारणी करा, असे आवाहन राष्ट्रीय क्रेडाई अध्यक्ष सतीश दादा मगर यांनी खास मुलाखतीतून केले.

क्रेडाई महाराष्ट्र या राज्यव्यापी बांधकाम व्यावसायिक संघटनेस २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ऑनलाइन पद्धतीने खेळीमेळीत पार पडली, अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष राजीव परीख आणि मानद सचिव सुनील कोतवाल यांनी दिली.

महाराष्ट्रातील ५७ शहरांतील क्रेडाई चॅप्टर्स मधून जवळपास १००० हून अधिक सदस्य सभेत सहभागी झाले होते. मुलाखतीतून यावेळी त्यांच्या उपस्थितीत ११ माजी अध्यक्षांचा ऑनलाईन सत्कार समारंभ संपन्न झाला. राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल जी कटारिया यांनी जीएसटी, बांधकाम नियमावली, रेडीरेकनर, स्टॅम्प ड्युटीसाठींच्या राज्य व केंद्र सरकारच्या तरतुदींचा उहापोह केला.

राष्ट्रीय कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी बांधकाम व्यावसायिकांसाठी उदयोन्मुख संधी यावर प्रकाशझोत  टाकला.  बांधकाम खर्चात कशी कपात करावी. यावर उदबोधक माहिती दिलीप मित्तल व निलेश अगरवाल यांनी देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.

राजीव परीख यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सन २०१९-२० मधील क्रेडाईच्या कार्याचा आढावा घेऊन सभासदांना संघटनेचे महत्व कथित केले. खजिनदार गिरीश रायबागे यांनी वार्षिक हिशोब सादर केला. मानद सचिव सुनील कोतवाल यांनी सूत्रसंचालन केले.

शिरपूर  येथे  नवीन ५७ व्या क्रेडाई चॅप्टरचे अनावरण सर्व मान्यवरांचे हस्ते झाले. शांतीकुमार जैन यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी वार्षिक बुलेटीन व शहरांचे माहिती पुस्तक अनावरण करण्यात आले. सहसचिव विकास लागू यांच्या आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.