कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्याला अवैध धंद्यांपासून मुक्त करण्यासाठी धडक कारवाईची मोहीम हाती घेतल्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाच्या या अवैध धंदा हटाव मोहिमेला शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सुरुंग लागल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद गावामध्ये एका हॉटेलच्या अगदी मागे एका बंद खोलीत तीन पानी जुगार अड्डा राजरोसपणे सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात हा जुगार अड्डा सुरू असल्याने स्थानिक महिला वर्गातून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख जिल्ह्याला अवैध व्यवसायापासून मुक्त करत असताना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार कशा प्रकारे सुरू आहे..? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, तसेच नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नुकतेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून संतोष माने यांनी पदभार स्विकारला आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाला स्थानिक पातळीवर महत्व देऊन, नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे या अवैध जुगार अड्ड्यावर तातडीने आणि कठोर कारवाई करून दाखवणार का..? याकडे कवठेगुलंदसह कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्दीतील संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.