कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण, ऊस दर, दुध दर कपात, यासह इतर मागण्यांसाठी कोल्हापुरात काहीसं तणावपुर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ही दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन सतर्क झालं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर ते अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर ते लगेचच पुन्हा मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र गतवेळी प्रमाणे त्यांच्या दौऱ्याबाबत गुप्तता ठेवण्यात आली नाही. मात्र दौऱ्याची घोषणा अचानक केली असल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे.

गेल्याच महिन्यात याच पद्धतीने मुख्यमंत्री शिंदे हे येथील कणेरी मठावर आले होते. या ठिकाणी दोन औपचारिक छोटे कार्यक्रम करून रात्री साडेतीन वाजता ते मुंबईला रवाना झाले होते. आज सकाळपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची कोणतीही कल्पना नव्हती. परंतु दुपारनंतर त्यांचा हा दौरा आल्यानंतर प्रशासनाने तातडीने दौऱ्याच्या तयारीला सुरुवात केली.