इचलकरंजी  (प्रतिनिधी) : येथील एसटी आगारामध्ये काही अज्ञातांनी घुसून १२ एसटी बस आणि ५ दुचाकींची तोडफोड केली.  यात ४ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार मंगळवारी रात्री उशीरा झाला. ही तोडफोड कोणी केली. व त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या एसटी बसच्या अपघातात एक तरूण ठार झाला होता. या रागाच्या भरात हे कृत्य मयत तरूणाच्या नातेवाईकांनी केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शहरामधील वर्धमान चौकात दोन दिवसापूर्वी एसटी  बसने दुचाकीला जोराची धडक दिली होती. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मयत झालेल्या तरुणाच्या  नातेवाईक व मित्रांनी रात्री १ वाजण्याच्या सुमारास आगारामध्ये जाऊन  दहशत माजवली. तसेच  एसटी बसवर दगडफेक  करत कर्मचाऱ्यांना काट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे समजते. या मारहाणीत ४ कर्मचारी जखमी झाले असून  त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी रात्री एकत्र येऊन दहशत माजविणाऱ्या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकारामुळे   एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वातावरण तणावपूर्ण झाले आहे.