सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कणकवली शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अवैध उलाढालीवर अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट धाड घालून कारवाई केली. अंधारी चाळ परिसरातील कणकवली तालुक्याच्या मुख्य मटका अड्ड्यावर आज गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांनी धाड टाकली.
काही महिन्यांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व मटका अड्डे बंद करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर काही काळ हा व्यवसाय थांबला होता. परंतु अलीकडेच पुन्हा सुरू झालेल्या मटका जुगाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः कारवाई करत पोलिस प्रशासनालाही धास्तावून सोडले.
धाडीनंतर पालकमंत्री राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना घटनास्थळी बोलावून माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने दाखल झाले आणि या अड्ड्यावरून ११ संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप, मटक्याच्या पावत्या अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेबाबत जनतेत नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत.