सांगली : सांगली लोकसभेसाठी बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांनी आज (22 एप्रिल) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघार न घेता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि आपला निवडणूक अर्ज कायम ठेवला. त्यामुळे सांगली लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार आहे. तसेच कोणत्या उमेदवाराला कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी विशाल पाटील यांना लिफाफा तर स्वाभिमानीला शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज निश्चित झाल्यानंतर विशाल पाटील यांना कोणते चिन्ह मिळणार? याकडे सुद्धा लक्ष होते. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलेंडर या चिन्हांची मागणी केली होती. मात्र, विशाल पाटील यांनी मागणी केलेल्या तिन्ही चिन्हांपैकी एकही चिन्ह मिळालेलं नाही. त्यांना लिफाफा हे चिन्ह भेटलं आहे. दुसरीकडे, विशाल पाटील यांनी मागणी केलेलं शिट्टी चिन्ह स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेलं आहे. माजी खासदार राजू शेट्टी हातकणंगलेतून आणि सांगलीमधील स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे हे शिट्टी या चिन्हावर रिंगणात असणार आहेत.

सांगली लोकसभेसाठी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे लोकसभेच्या मैदानातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे माघार घेणार का? की आपली बंडखोरी कायम ठेवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत महाविकास आघाडीला धक्का दिला.. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत होती, तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून विशाल पाटलांनी अर्ज माघार घेण्याबाबत दबाव देखील टाकण्यात येत होता. पण पक्षाचा आदेश धुडकावत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांचं पक्षातून निलंबन होणार का? याकडे सर्वांचे ल्स्ख लागून राहिले आहे.