मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यातील शिवसैनिकांच्या नजरा असतात. पण कोरोनामुळे गेल्या वर्षी दसरा मेळावा उत्साहात झाला नाही. त्यामुळे यंदा तरी मेळावा होणार का? असा प्रश्न असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मेळाव्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आज (बुधवार) ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी राऊत म्हणाले की, दसरा मेळावा नक्कीच होईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने होणार नाही हे निश्चित. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन दसरा मेळाव्यासंबंधित निर्णय घेण्यात येणार आहे. यंदाही कोरोना प्रादुर्भाव असला तरी दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होणार हे निश्चित, असे ही ते म्हणाले. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संजय राऊत यांनी मंगळवारी भेट घेतली होती. तसेच त्यांनी हिंसाचारावरून भाजपवर हल्लाही चढवला होता.