कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलातील सवलतप्रश्नी राज्यभर वादंग निर्माण झाला आहे. याच प्रश्नासंबंधी भाजपच्या महिला नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्टिटरवरून सरकारवर खोचक टीका  केली आहे. ‘आमचं कुटुंब आमची जबाबदारी, न् तुमच्या लाईट बिलला आता जनतेची कोल्हापुरी’ अशा खोचक शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे.

वाढीव वीज बिलप्रश्नी कोल्हापुरातील सर्वपक्षीय कृती समितीही आक्रमक झाली आहे. विविध पातळ्यांवर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधत आहे. वीज बिल भरणार नाही, मागायला येणाऱ्यांना कोल्हापुरी पायताणाला तेल लावले आहे, अशा आशयाचा डिजिटल फलक शहरातील चौकाचौकात लावण्यात आले आहेत. कोल्हापुरी पायताणाची विशेष ओळख आहे. म्हणूनच महाडिक यांनी टीका करताना ‘तुमच्या लाईट बिलाला आता जनतेची कोल्हापुरी’ अशी जिव्हारी लागण्यासारखी टीका सरकारला उद्देशून केली आहे.