उस्मानाबाद (प्रतिनिधी) : राज्यपाल हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना  या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचीही प्रतिष्ठा राखायला हवी. कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जी भाषा वापरली याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे राज्यपालपदावर आता त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर शरसंधान केले आहे.

पवार हे सध्या उस्मानाबाद, लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या राज्यपाल-मुख्यमंत्री यांच्यातील वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, मी आजपर्यंत अनेक राज्यपाल पाहिले. सत्तेत असताना अनेक राज्यपालांशी  संबंधही आला. पण, असे भाष्य करण्याचे धाडस कुणी केले नाही. याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी आता स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार ! त्यामुळे ही म्हण इथे लागू होत आहे की नाही ते पाहावे लागेल. पण राज्यपाल हे शहाणे आहेत, त्यामुळे हा शब्द योग्य आहे की नाही, ते मला माहिती नाही, असा टोलाही शरद पवारांनी राज्यपालांना लगावला.