मंडणगड: रायगड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणा, असे आवाहन माजी मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ मंडणगड येथील जाहीर सभेत बोलत होते.

पुढे बोलताना रामदास कदम कदम म्हणाले, अनंत गीते यांच्या दोन लोकसभा निवडणुकीचा खर्च मी केला आहे. मात्र या उपकाराची परतफेड मला गुहागर मतदारसंघात पाडून केली. दुसर्‍याचा खड्डा खणण्याचे काम करणार्‍या अनंत गीते यांचे डिपॉझिट जप्त करा असे सांगतानाच पाठीत खंजीर खुपणारा आणि कोकणाला लागलेला हा काळा डाग धुवून टाका असे आवाहनही रामदास कदम यांनी केले.

सुनिल तटकरे तुम्ही प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आणि केंद्रात मंत्री होणार हे नक्की आहे. मात्र मंत्री झाल्यावर माझ्या रायगड जिल्हयात विकास योजना आणा असा शब्द रामदास कदम यांनी सुनिल तटकरे यांच्याकडून घेतला.
उद्योग गुजरातला गेले अशी बोंब ठोकत आहेत. पण खेडमध्ये येणारा उद्योग याच उध्दव ठाकरे यांनी थांबवला परंतु तेच काम उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ४० दिवसात ७५ एकर जमीन आणि मंजुरी देत केले यामुळे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे असेही रामदास कदम म्हणाले.

नऊ वेळा खासदार होऊनही काही करु शकले नाही ते आता निवडणूक लढवून काय विकास करणार आहेत असा थेट सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अनंत गीते यांच्यावर आरोप करताना केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवडे गावी जागतिक स्तरावरील स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हे सरकार गतीमान पध्दतीने काम करत आहे. आचारसंहिता संपताच वक्फ बोर्डाचे कार्यालय रत्नागिरीत सुरू केले जाईल असा शब्द उदय सामंत यांनी दिला.

या मतदारसंघातील ७० टक्के मुस्लिम समाज आमच्या महायुतीसोबत आहेत असे सांगतानाच विकासकामांचा दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजे सुनिल तटकरे अशा शब्दात उदय सामंत यांनी सुनिल तटकरे यांचे कौतुक केले.

३० वर्षे अनंत गीते यांना निवडून दिले त्यात त्यांनी दोन वेळा मंत्रीपद भूषवले होते मात्र त्यांना जनतेची जाणीव नाहीय अशा शब्दात आमदार योगेश कदम यांनी अनंत गीते यांचा समाचार घेतला.

अनंत गीते फक्त जातीच्या नावाखाली मते मागत आहेत. संकटाच्या वेळी अश्रू पुसायला अनंत गीते आले नाहीत तर सुनिल तटकरे आणि मी स्वतः आलो होतो असेही योगेश कदम म्हणाले.

एमआयडीसीबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. आचारसंहिता संपल्यानंतर एमआयडीसी मंडणगड तालुक्यात आणल्याशिवाय शांत बसणार नाही असा शब्द आमदार योगेश कदम यांनी दिला.

मंडणगड तालुक्यातून दहा हजाराचे मताधिक्य देऊ आणि दापोली येथून श्रीवर्धन मतदारसंघापेक्षा जास्त मताधिक्य देऊ असेही योगेश कदम म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महायुतीचे जाहीर सभा मंडणगड शहरात मोठया उत्साहात आज पार पडली.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री आणि रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत, दापोली – मंडणगडचे आमदार योगेश कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी, आरपीआय जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रकाश शिगवण आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.