कोल्हापूर :  गणरायाच्या आगमनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागामध्ये पर्यावरणपूरक ‘सीड’ गणेश प्रतिकृती कार्यशाळेचे आयोजन दि. २५ ऑगस्ट रोजी दु. ३ ते ५ या दरम्यान केले आहे.

अविघटनशील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्त्यांचे अनेक दुष्परिणाम आहेत. मूर्तीच्या आकाराचा, रंग रंगोटीचा मूर्तीच्या देवत्वाशी संबंध नसतो. त्यापेक्षा मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती या जास्त निसर्गपूरक असतात. कार्यशाळेदरम्यान गणेशमूर्ती तयार करताना त्याच मातीमध्ये आपल्याला हव्या फुलझाडांच्या बिया रुजविल्या जातील. तयार केलेल्या मूर्तीचे गणेशोत्सवात पूजन होईल. गणेश विसर्जनाच्या दिवसापासून मूर्तीला पाणी घातले जाईल आणि थोड्या दिवसांत त्या मातीतून तुमची आवडती फुलझाडे येतील. या संकल्पनेवर आधारित ही कार्यशाळा असणार आहे. या कार्यशाळेसाठी कलानिकेतन महाविद्यालय येथील गौरव काईंगडे टेराकोटा तज्ञ हे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या गणेशमूर्त्या तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. साधारणतः १ किलो मातीपासून ३ ते ४ लहान आकाराच्या गणेशमूर्ती तयार करता येतात. हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी दिली.