कुरुंदवाड (प्रतिनिधी) शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड – नांदणी – भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सी परिसरात सागर कोप्पे यांच्या शेताजवळ एका चारचाकी गाडीत सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम या 35 वर्षीय युवकाचा शरीरावर धारधार शस्त्राने घाव करून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी समोर आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संतोष कदम यांनी नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेतले होते. यानंतर कदम यांच्याकडे आरोपींनी पैशासाठी तगादा लावला होता. मात्र मृत कदम हे पैसे परत देत नसल्याने आरोपींनी त्यांचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात सध्या सांगलीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच संशयीत आरोपींनी गुन्हा कबूल केला असल्याचे ही म्हटले आहे. असे असले तरी या प्रकरणाचा तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत असून याबाबत अधिक तपास सुरु असल्याची ही माहिती पोलिसांनी दिली आहे.