मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुखमंत्री मनोहर जोशी यांनी तुझे तिकीट कापले. त्यांचे घर जाळ, असा आदेश खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यांनी मला अडकवण्याचे काम केले होते. संजय राऊत शिवसेना संपवत आहेत, असा धक्कादायक आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे.

शिवसेनेत १९७९ पासून मी गटप्रमुख शाखाप्रमुख, विभागप्रमुख पदावर कार्यरत आहे. आजतागायत मी मतदारसंघ बांधून ठेवला. शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो; पण आदेश बांदेकरासारखा उपरा येऊन उभा राहणार असेल, तर मी काय करायला हवे होते? असा सवाल सरवणकर यांनी केला.

अनेक निष्ठावंत शिवसैनिकांचा संजय राऊतांवर रोष आहे. संजय राऊत २००२ मध्ये आले. त्यांनी कोणती आंदोलने केली? संजय राऊत एकातरी आंदोलनात सहभागी झालेत का? असेही सदा सरवणकर यांनी विचारले. ‘सामना’चे ऑफिस माझ्या नेतृत्वाखाली उभे राहिले. त्यामुळे आता त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये, अशा शब्दांत सरवणकर यांनी राऊतांना फटकारले आहे.

आम्ही कोणीही शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाही. मी जनतेचा आमदार आहे, पण माझ्या विभागातील कामंच होणार नसतील तर मी मतदारांसमोर कसे जाणार? माझ्या मतदारसंघात शिवडी रस्त्याचे काम सुरु आहे, पण त्यात ३ हजार कुटुंब बाधित होत असल्याने ही कुटुंबे दुसरीकडे स्थलांतरित केली जात आहे; पण कुठलीही पूर्वव्यवस्था न होता त्यांची घरे तोडली. मी त्यांना उत्तरे काय देणार? असे सवाल सरवणकर यांनी उपस्थित केला आहे.

मतदारसंघातील लोकांचा रोष वाढत चालला आहे. शिवसेना भवनाच्या बाजूला असलेली जवळपासून पाच हजार कुटुंबे गेल्या दहा वर्षे यातना सहन करत आहेत. ५० पत्रे शासनाला दिले पण अजूननही त्यावर कुणीही मार्ग काढला नाही. आमदार म्हणून मी आणखी काय करायला हवे होतं? असा सवालही सरवणकरांनी विचारला.

जर सरकार कामच करत नसेल तर अडचणीत येईल की नाही याची काळजी केली नाही. पण लोक रस्त्यावर उतरले. गृहनिर्माण मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाडांनी लक्ष दिले नाही. हा प्रश्न अजून गुंतागुंतीच होईल यासाठी जास्त प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेस आज शिवसेना गिळंकृत करण्याचे काम करत आहे, असा आरोप सदा सरवणकरांनी राष्ट्रवादीवर केला.