दुबई (वृत्तसंस्था) : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असून, दोघे घटस्फोट घेणार असल्याचे आता निश्चित  झाले आहे. त्यांचा १२  वर्षांचा सुखी संसार मोडला आहे; मात्र सानिया मिर्झ आणि शोएब मलिककडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक दुबईमध्ये एका आलिशान बंगल्यामध्ये एकत्र राहत होते. आता सानिया मिर्झाने हे घर सोडले असून, तिने दुसरे घर घेतले आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हे दोघेही सोबत राहत नाहीत. दोघेही आपला मुलगा इजहान मलिकची को-पॅरेंटिंग करत आहेत.

शोएब मलिकच्या एका जवळच्या व्यक्तीने त्यांच्या घटस्फोटाबाबत सांगितले की, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट फायनल झाला आहे. दोघेही बऱ्याच काळ एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. आता दोघांनी औपचारिकरीत्या घटस्फोट घेतला आहे. शोएब सध्या पाकिस्तानमध्ये राहत असून, तो एका टीव्ही चॅनेलसाठी टी-२० वर्ल्ड कप २०२२ च्या पॅनलचा भाग आहे. त्यामुळे तो सध्या दुबईला जाऊ शकत नाही.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक ही जोडी क्रीडा जगतातील सर्वात लोकप्रिय जोडी मानली जाते. सानिया मिर्झाने २००९ मध्ये शोएब मलिकसोबत साखरपुडा केला होता. २०१० मध्ये त्यांचे लग्न झाले. हैदराबादमधील ताज कृष्णा हॉटेलमध्ये पारंपरिक हैदराबादी मुस्लिम विवाह पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. सानिया मिर्झाने ऑक्टोबर २०१८ मध्ये मुलगा झाल्याची घोषणा केली होती.