कागल (प्रतिनिधी) : कागल – सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी झाल्यानंतर रस्ते सुरक्षा वाढेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मंत्री मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील या लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचा सर्वे केला. कोगनोळी टोल नाक्याजवळच्या कागल हद्दीपासून घुणकी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचा हा सर्वे झाला.

याबाबत माहिती देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या आधी झालेल्या चारपदरी राष्ट्रीय महामार्गामुळे काही तांत्रिक त्रुटी राहून गेल्या होत्या. त्यामुळे रस्ते वाहतुकी सहप्रवासी वाहतुकीलाही अडचणी व धोके निर्माण झाले होते. या महामार्गाच्या सहापदरी कारणामुळे हे सर्व धोके व अडचणी निघून जाऊन वाहतूक सुरळीत होईल. या सर्वेमध्ये महामार्गावरील बोगदे, जोड-रस्ते उड्डानपुले, तसेच भुयारी मार्ग आदी समस्यांचा अभ्यासपूर्ण सर्वे झाला.

या सर्वेक्षणाच्या पाहणीवेळी नागरिक, प्रवासी आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी व उद्योजकांनी सुरक्षेबाबत काही निवेदनेही दिली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रीय महामार्ग सेवा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने, उपाध्यक्ष संजय ठाणेकर, नगरसेवक प्रवीण काळबर, माजी उपनगराध्यक्ष आनंदराव पसारे, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर, सर्वेअर व्ही. एन. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

चौकट

सर्वेक्षणावेळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी कागल -हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ लक्ष्मी टेकडी जवळ भेटले. सध्या असलेली महामार्गाची धोकादायक स्थिती त्यांनी प्रत्यक्षात दाखवून दिली व लक्ष्मी मंदिरासमोर उड्डाणपुलासह सेवा रस्त्यांचीही मागणी आवश्यकता पटवून दिली.