कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या नावाव्यतिरिक्त वेगळी नावे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिली आहेत. ते राज्यपालांना भेटून दिलेल्या नव्या नावात भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव नाही. यामुळे खोतही राज्यपाल नियुक्त आमदार निवडीमध्ये खोडा घालत कुरघोडी केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  

खोत यांनी आज (बुधवारी) सकाळी बाराच्या सुमारास राज्यपालांची भेट घेऊन त्यांना यादी सादर केली. त्यात सामाजिक कार्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे, लेखक विठ्ठल वाघ, विश्‍वास पाटील, क्रिकेटपटू झहीर खान, तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे, सामाजिक कार्यासाठी अमर हबीब, प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, पोपटराव पवार, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. प्रकाश आमटे, सत्यपाल महाराज आणि बुधाजीराव मुळीक यांचा समावेश आहे. या लोकांनी सामाजिक कार्यात झोकून दिले आहे.  त्यांना आजवर कुठेही संधी मिळालेली नाही. राज्यपाल नियुक्त आमदार करून त्यांच्या कार्याचा सन्मान कराच, शिवाय धोरण ठरवणाऱ्या मोठ्या सभागृहाचे सदस्य करून त्यांच्या विचारांचा उपयोग करून घ्या, असे आवाहन खोत यांनी केले आहे.