मुंबई (प्रतिनिधी) : सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा आजपासून (बुधवार) वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १ ऑक्टोबररोजी केवळ १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवल्या होत्या. आता तेल कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यापुढे एलपीजी सिलेंडरची किंमत १ हजार रुपयांच्या पुढे जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत ८४४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपये झाली आहे. १ ऑक्टोबररोजी १४.२ किलो अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. तर १ सप्टेंबररोजी १४.२ किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडर २५ रुपयांनी महाग झाला होता.  यापूर्वी, १८ ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. गेल्या एका वर्षात दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ३०५.५० रुपयांची वाढ झाली आहे, तर आता अनुदानही येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महागाईमुळे कंबरडे मोडले आहे.