कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व बँकेकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला थेट मेंबरशिप मिळालेली आहे. रिझर्व बँकेने ही मान्यता आज पत्राद्वारे केडीसीसी बँकेला कळवली. दरम्यान; रिझर्व बॅंकेकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार सर्व निकषांमध्ये पात्र ठरल्यानंतर के. डी. सी. सी. बँकेला ही मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे केडीसीसी बँकेला स्वतःच्या आय. एफ. एस. सी. कोडसह एन. ई. एफ. टी., आर. टी. जी. एस., एन. डी. एस. – ओम व एन. डी. एस. – कॉल मनी या महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत. तसेच; यापुढे केडीसीसी बँक इतर अर्बन बँकांना सब मेंबरशिप देऊ शकणार आहे, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, यापूर्वी केडीसीसी बँकेने आयडीबीआय बँकेकडून सब मेंबरशिप घेतली होती. या सब मेंबरशिपच्या माध्यमातून आय. एफ. एस. सी. कोडसह एन. ई. एफ. टी., आर. टी. जी. एस. आदी व्यवहार व्हायचेत. तसेच; महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सब मेंबरशिपखाली एन. डी. एस. – ओम ही सुविधा मिळत होती. यापुढे केडीसीसी बँकेच्या स्वतःच्या हक्काच्या या सुविधांमुळे आरटीजीएस व एनईएफटी या सुविधा ग्राहकांना तात्काळ उपलब्ध होवून व्यवहाराच्या रक्कमा तात्काळ जमा होणार आहेत. तसेच; एखाद्या खातेदाराचा प्रॉव्हिडंट फंड किंवा इन्कम टॅक्स रिटर्नची रक्कम जमा होत असताना राष्ट्रीयकृत बँकांचा आयएफसी कोड नंबर लागायचा. अशा रकमासुद्धा या नव्या सुविधेमुळे केडीसीसी बँकेच्या ग्राहकांच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत.

आरबीआयच्या थेट मेंबरशिपचे फायदे…..!

१. इतर स्पॉन्सर बँकेवर अवलंबून न राहता आरबीआयच्या पेमेंट सिस्टम्सना थेट प्रवेश.

२. इतर बँकांमार्गे होणाऱ्या व्यवहारातील विलंब टळून जलद व्यवहार, कमी अवलंबित्व व कार्यक्षमता वाढ

३. बँक एन. इ. एफ. टी. व आर. टी. जी. एस. या सुविधा दिवस-रात्र देऊ शकते.

४. सर्व व्यवहारांचे सेटलमेंट थेट RBI मध्ये असलेल्या बँकेच्या करंट अकाऊंटमधून होते. त्यामुळे लिक्विडिटी मॅनेजमेंट आणि पारदर्शकता वाढते.

५. RBI प्रणालींशी थेट कनेक्टिव्हिटीमुळे डेटा सुरक्षितता आणि गोपनीयता वाढते. व्यवहारांवर बँकेचे पूर्ण नियंत्रण राहते.

६. थेट सदस्यांना RBI कडून MIS रिपोर्ट, सेटलमेंट फाइल्स व ऑडिट ट्रेल्स मिळतात. इनवर्ड आणि आऊटवर्ड व्यवहारांचे मिलान अधिक सोपे होते.

७. इतर RBI प्रणालींशी एकत्रिकरण: e-Kuber, Centralised Treasury System आणि RTGS Gateway यांसारख्या इतर RBI प्लॅटफॉर्मशी सहज समाकलन (integration) करता येते. भविष्यातील नवीन पेमेंट सिस्टम्समध्ये सामील होणे सुलभ होते.

८. संस्था पूर्ण सदस्य म्हणून कार्य करते, कोणत्याही बँकेच्या अधीन नाही. स्वतःचा IFSC कोड प्राप्त होतो. त्यामुळे तिची विश्वसनीयता, प्रतिमा आणि स्वायत्तता वाढते.

९. थेट सदस्यांकडे स्वतःचे RTGS इंटरफेस / SFMS कनेक्शन असते. त्यामुळे व्यवहार प्रणाली अधिक विश्वसनीय आणि सातत्यपूर्ण राहते, इतर बँकांच्या अडचणींचा परिणाम होत नाही.

१०. इन्कम टॅक्स रिटर्न सादर करताना ग्राहकाने दिलेला खाते नंबर इन्कम टॅक्स विभाग त्या संबंधित बँकेकडे चेक करत असते. सब मेंबर बँकेस सदर सुविधा प्राप्त होत नाही.

यापूर्वी केडीसीसी बँकेच्या केंद्र कार्यालयातील मुख्य शाखेसह सर्वच म्हणजे १९१ शाखांसाठी आयएफएससी कोड नंबर एकच होता. यापुढे प्रत्येक शाखेसाठी वेगळा आयएफएससी कोड नंबर असणार आहे. त्यामुळे साहजिकच आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक सुलभता आणि गतिमानता येणार आहे.