गारगोटी (प्रतिनिधी) : राज्य शासनाने नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग करण्याचे नियोजित केले आहे. या महामार्गामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई अंबाबाई महालक्ष्मी आणि दख्खनचा राजा जोतिबा या दोन्ही तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, यामध्ये कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातील हजारो एकर क्षेत्र या मार्गात संपादीत करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्यात असंतोष पसरला आहे. यामुळे आमदार आबिटकर यांनी या मार्गीका बदला अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदमापूरचे श्री संत बाळूमामा देवस्थानाचाही समावेश भक्तिमार्गामध्ये करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने बाळूमामा देवस्थानचाही समावेश या भक्तिमार्गामध्ये करण्यात आला. परंतु, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो एकर क्षेत्र या भक्तीमार्गामध्ये संपादित करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यांमध्येही शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत. याबाबत भुदरगड तालुक्यातील म्हसवे, वाघापूर, मडिलगे खुर्द, आकुर्डेसह तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी या महामार्गामुळे आपली शेती संपादित होणार असून आम्ही भूमी होणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या अनुषंगाने माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत या मार्गाला तत्काळ स्थगिती द्यावी. तसेच या महामार्गाची मार्गीका बदलण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.

त्यानुसार एमएसआरडीसीकडून प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम आणि असंतोष हा महामार्ग रद्द करून दूर होणार आहे.