कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या कृषी विधायक आणि नवीन शैक्षणिक धोरणा विरोधात आज (मंगळवार) भारतीय दलित महासंघाच्या वतीने गांधीनगर-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे गांधीनगर पोलीस स्टेशनचे गोपनीय अधिकारी अशोक पोवार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने दहशतीच्या आणि संसदीय सदस्यांच्या बळावर घटनाबाह्य कृषी कामगार आणि नविन शैक्षणिक विधेयक मंजूर करून शेतकरी, कष्टकरी, कामगार, उपेक्षित आर्थिक दुर्बल घटक यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांसह कष्टकरी कामगारांना, विद्यार्थ्यांना होणार आहे. यावेळी सदरची विधेयके मागे घेण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात भारतीय महासंघाचे युवा जिल्हा अध्यक्ष सागर घोलप, पंकज घोलप, प्रदीप माने, राजू सोरटे, महेश पुजारी, प्रकाश साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.