गारगोटी (प्रतिनिधी) : जंगलामध्ये वन्यप्राण्यांना आवश्यक असणारा चारा आणि मुबलक पाणी नसल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये शिरकाव करत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. अतोनात खर्च करून कष्टाने जगविलेली पिके वन्यप्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून वन्यप्राण्यांना जंगल हद्दीतच आवश्यक असणारा चारा आणि पाण्याची मुबलक सोय करण्यासाठी मोहिम हाती घ्या, अशा सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ते गारगोटी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान झालेल्या ३९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई धनादेश वाटप कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, वन्यजिव प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होऊ नये, याकरीता कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण झाले आहेत. वन्यप्राणी पिकांची नासाडी करतात त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. प्राण्यांकडून पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून, यावर उपाय म्हणून जंगल हद्दीमध्ये वन्यप्राण्यांकरीता त्यांना आवश्यक असणारा चारा आणि पाणी मुबलक प्रमाणात देणे गरजेचे आहे. त्याकरीता जंगल हद्दीजवळ असणाऱ्या ग्रामपंचायतींशी संपर्क साधून ज्याठिकाणी आवश्यकता आहे, त्याठिकाणी चारा आणि पाण्याची सोय तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी माजी सभापती बाबा नांदेकर, वनपरिमंडळ अधिकारी राऊत, के. एच. पाटील यांच्यासह वनविभाचे अधिकारी आणि नुकसान ग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.