कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी राज्य इरिगेशन फेडरेशन, सर्वपक्षीय कृती समितीतर्फे आज (मंगळवार) सकाळी ताराबाई पार्कातील महावितरणच्या कार्यालयास गनिमीकाव्याने टाळे लावून आंदोलन करण्यात आले. या वेळी काही वेळ अधिकाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून गुलाबपुष्प देत रोखण्यात आले. यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिले.
कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेकांचे रोजगार गेले. हातावर पोट असणाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. यामुळे या काळातील वीजबिल माफ करावे, अशी मागणी कृती समितीतर्फे वेळोवेळी करण्यात आली आहे. तरीही वीज प्रशासनाकडून बिल भरण्यासाठी तगादा सुरू आहे. म्हणूनच कृती समितीतर्फे आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
आंदोलन दुपारी १२ वाजता करणार असे जाहीर केले, प्रत्यक्षात आंदोलकांनी गनिमीकाव्याने सकाळी ९ वाजताच येऊन कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून कुलूप काढून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात सोडले. त्यानंतर दुपारी दीडपर्यंत कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन झाले. कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज बिल भरायचे नाही. बिल न भरल्यास कनेक्शन तोडण्यासाठी येणाऱ्यांना कोल्हापुरी हिसका दाखवायचा, पुढील काळात उग्र आंदोलन करायचे, असे निर्णय घेऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
आंदोलनाच्या ठिकाणी वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जालिंदर पाटील, बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, विक्रांत पाटील आदीची भाषणे झाली.