कोल्हापूर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले हॉस्पिटल अधिक दर्जेदार तसेच सर्व सुविधायुक्त बनवण्यावर महापालिकेने सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये ऑक्सिजनबेड करण्यास प्राधान्य असून तिसऱ्या मजल्यावर गरोदर माता आणि महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड लवकरच विकसित केला जाईल, अशी माहिती स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी दिली.
स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी आज (शनिवार) आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, उपशहर अभियंता बाबुराव दबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ.कृष्णा केळवकर, डॉ. मंजुश्री रोहिदास, माजी नगरसेवक विनायक फाळके यांच्यासह सर्व संबधित अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर गरोदर मातांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचे काम सुरु असून हे काम येत्या आठवडाभारात पूर्ण करा, अशी सूचना करुन सभापती सचिन पाटील म्हणाले की, तिसऱ्या मजल्यावरील कामे पूर्ण करण्याबरोबरच दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये ऑक्सिजनबेड तयार करण्यासही प्राधान्य द्या. यामध्ये दोन महिन्याच्या आतील बाळांसाठी आणि दोन महिन्यांच्या वरील बाळांसाठीही आयसीयू सुविधा उपलब्ध करण्यासाठीची प्रक्रिया गतीमान करण्याची सूचनाही त्यांनी केली. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल हे शहरवासियांच्यादृष्टीने अतिशय जिव्हाळयाचे आणि महत्वाचे हॉस्पिटल असून हे हॉस्पिटल अत्याधुनिक आणि सर्व सुविधांयुक्त बनविण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी स्थायी समिती सभापती सचिन पाटील आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील सुरू असलेल्या कामांची माहिती घेऊन पाहणी केली.